हातभर बाही, मानेपर्यत कॉलर गळा, ञिकोणी ओढणी....युनिफॉर्म
मी कोणत्याही कॉलेजला असले की त्याच्या शेवटच्या वर्षी यूनिफॉर्म होतोच. Bad luck वगैरे म्हणणार नाही कारण नशीबावर आपला विश्वासच नाही. परवा अचानक मला समजले की आमच्यासाठी कॉलेजने यूनिफॉर्म केलाय. चार वर्ष काढली या कॉलेज मध्ये, आता हे शेवटचे वर्ष आणि नेमका आत्ताच यूनिफॉर्म व्हावा! जरा नाखूष होते. पण असो, कॉजेलाही काही प्रोटोकॉल्स पाळावे लागतात म्हणून घेतला असेल हा निर्णय. तो मान्य करणे आणि त्याचे अनुसरण करणे ही विद्यार्थी म्हणून आमची जबाबदारी आहे. यूनिफॉर्म चा फोटो पाहीला आणि......... शब्दच सुचले नाहीत. एक ठिणगी पडावी व मनात विचारांचा वणवा पेटावा असं झालं काहीसं. हातभर बाही, मानेपर्यत कॉलर गळा आणि ञिकोणी ओढणी. रंग वगैरे भाग नंतरचा, त्याचा फार विचार करत नाही मी. पण हा असा ड्रेस आपण रोज घालायचा? का? बाही हातभरच का? कशासाठी? थंडी लागते म्हणून? कॉलर व ते ही पुर्ण बंदिस्त गळा. का? चुकून खाली वाकलो तर काही दिसू नये म्हणून? ञिकोणी ओढणी. का? कशासाठी? असं काय आणि का झाकून ठेवायचय? ओढणीने झाकलेच पाहिजे का? बरं एवढं सगळं घालूनही नजरेने होणारे बलात्कार थांबतील का??? ...