श्वेता......एक अधूर पान
प्रिय श्वेता,
काय झालं गं हे सगळं ? कुठं गेलीस तू ? मी कल्पनाही करू शकत नाहीये तुझ्या जाण्याची. रात्रभर झोप लागली नाही गं काल. सतत तू आणि तुझ्या गोंडस पऱ्या प्राप्ती आणि शुभ्रा डोळ्यांसमोर येत होत्या. तू खूप सुंदर होतीस हा काय गुन्हा होता तुझा ? लहान वयात लग्न झाले तुझे ते ही तुझ्यापेक्षा वयाने खूप मोठ्या असलेल्या माणसाशी. परिस्थितीने हे करायला भाग पाडलं ना गं तुला ? तुला आठवतंय का तुझ्या लग्नाच्या मिरवणुकीसाठी मी तुला नटवले होते. तुझ्या मृत देहावर हार आणि फुलं पडताना मी नाही गं पाहू शकत. ए श्वेता, ऐकतेस ना गं ?
खूप वेदना सहन केल्या ना गं तू ? तुझ्या मखमली देहावर निर्घृण वार करताना काहीच कसे नाही वाटले गं त्याला ? नवरा होता ना तो तुझा ? तुझ्या दोन मुलींचा बाप होता ना ? मग असा का वागला तो ? संशयीवृत्तीने पुरुषी अहंकार उफाळून आला त्याचा. मानसिक संतुलन घालवून बसला आणि विकृतीकडे झुकला. जिच्यावर जीवापाड प्रेम केलं तिलाच असं क्रूरतेने कसं काय मारलं त्याने ? ए श्वेता, बोल ना गं, तुझी तक्रार मांड ना ?
कहर म्हणजे तुझ्या छोट्या शुभ्राच्या डोळ्यांसमोर त्याने हे कृत्य केलं गं. काय वाटलं असेल त्या भाबड्या जीवाला ? माझा पप्पा माझ्या आईला मारतोय आणि ती रक्ताच्या थारोळ्यात पडलीये, हे कसे पाहिले असेल गं त्या लहानग्या लेकराने ? खूप रडू येतंय गं, पुरुषवर्गावर भयंकर राग साचतोय मनात. तूही बोलून घे ना. मन मोकळं कर गं श्वेता.
जेमतेम दोन वर्षांचं अंतर आपल्या दोघींच्या वयात. पण या वयात तुला दोन मुली, काय म्हणू या व्यवस्थेला ? कोण कोण गुन्हेगार आहेत तुझे, बोल ना गं. समता अशी गोड हाक दे ना गं मला. तू कशीही असलीस, तुझं चारित्र्य कसेही असले, तू कशीही वागलेली असलीस तरी तुझा जीव घेण्याचा अधिकार कोणालाही नव्हता. त्या नराधमाला कठोरातील कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. तुरुंगात सडला पाहिजे तो. वेदनांनी कवटाळले पाहिजे त्याला. तडफडत मेला पाहिजे तो आणि त्याचा पुरुषी अहंकार.
तुझ्या लहानशा पऱ्यांचा काय गं दोष ? त्यांना एवढ्या लहान वयात का हे सगळं सहन करावे लागले ? आता कसं होईल गं त्यांचं ? अशा खूप साऱ्या प्रश्नांचं वादळ मनात घोंगावतंय गं. मला काहीच समजत नाहीये. ए श्वेता, बोल ना गं काहीतरी. तू मला पुन्हा भेटणारच नाहीस का गं ? ऐकतेस ना ए श्वेता ? बोल गं, काहीतरी बोल गं.......
तुझीच,
समता.

Comments
Post a Comment