त्यांच येणं.....

     त्याचा पुसटसा आवाज माझ्या कानांवर पडला. मला वाटलं त्याने हाक मारली असावी किंवा शीळ घातली असेल कदाचित. कानोसा घेत मी दार उघडले. तो आला.... सैरभैर होऊ लागला. बऱ्याच दिवसांनी भेट झाली होती, रागवला होता बहुतेक. हल्ली वेळ कोठे असतो माझ्याकडे त्याला भेटायला. पण त्याचं असं येणं मला आवडले होते. मन अलगत आतून सुखावले होते. त्याचा प्रत्येक स्पर्श मला खेळवून ठेवत होता. त्याचे अस्तित्व मला जाणवत होते अगदी पापणीचा केस हळूवारपणे घसरत गालावर येवून रेंगाळतो तसेच.
     त्याला माझ्या केसांशी खेळायला फार आवडते. हलकेच बटांना तो छेडत असतो. कधी डोळ्यांवर तर कधी गालांवर, कधी कपाळावर तर कधी ओठांवर.... त्याचे ते रोमांचित स्पर्श मला भासत होते. मी माञ डोळे बंद करून होते. त्या अनुभवालाच जगत होते. पुढे या अनुभवाची आठवण होईल आणि ती मला कायम जिवंत ठेवायची आहे. आठवणींशिवाय जगणं म्हणजे आयुष्याशी बेईमानी आहे. तो सोबत असताना माझे डोळे नेहमी बंदच ठेवते मी, उघडले तर गालांवर खारट पाण्याचे टपोरे थेंब बैठक भरवतात. त्याला असाच अनुभवायला आवडते मला आणि कायम आवडत राहिल.
     मला सतावणे हा छंदच आहे त्याचा. खरं सांगू, त्याचं हे सतावणं ही मला आवडतं. एका वेगळ्याच दूनियेत पोहचते मी. तिथे फक्त आणि फक्त मी असते.... सोबतीला त्याचे अस्तित्व. तो ही माझ्यासारखा गुणगुणत असतो, नेहमीच. त्यावेळीही गात होता. आजही ते शब्द काळजात कोरून आहेत... "पास आईये के हम नहीं आयेंगे बार बार". पण तुला यावेच लागेल आणि येशीलच तु, मला ठाऊक आहे. निसर्गाचा नियम कधी चुकणार नाही. तो आयुष्यभराचा सोबती आहे फक्त त्याचे प्रेमाचे स्पर्श उमगले पाहिजेत, त्याच्या शब्दांना अर्थ दिला पाहिजे. एकाकीपणात तोच असतो सोबतीला.... कधीकधी
खिडकीचे दार उघडल्यावर भेटीस आलेला,
     असा बेभानं हा वारा........

                                    

Comments

Popular posts from this blog

दशकपूर्ती निमित्ताने.....

बेगम जान

नात्यातील कोडी उलगडताना.....