दहा दिवसांचा पाहुणा......


    दहा-बारा दिवसांपुर्वी मी काही कामानिमित्त बाहेर गेले होते. संध्याकाळी माघारी आले तर "तो" आला होता....नेहमीप्रमाणेच, या वर्षी जरा वेगळाच होता. तो आलाय सॉरी आणला गेलाय हे त्याच्या आवाजावरून समजले.
    मला रोज दिसायचा तो. त्याचा आवाज तर सतत कानावर पडत होता. यावर्षीचा जरा जास्तच ओरडत होता. माणसांची वर्दळ असेल नेहमी त्याच्याभोवती बहूतेक आणि इकडे तो एकलकोंडा झाला होता, म्हणून ओरडायचा....सारखाच.
    त्याला शांत करायला, त्याच्याशी बोलायला,त्याला भरपेट खाऊ घालायला,त्याला फिरायला घेऊन जायला माणसे होती. तरीही बिचारा एकटाच होता. त्याच्या सततच्या ओरडण्यामूळे त्याचे अस्तित्व जाणून यायचे. दहा दिवस कसे गेले कळालेच नाही. त्याला पाहण्याची, त्याच्या आवाजाची सवय होऊन गेली होती.
    काल त्याला पाहीले तेव्हा तो मस्तपैकी त्याच्या नादात होता. एकदम बिनधास्त. मी खूप वेळ निरखत होते त्याला. उद्याची सकाळ येवूच नये असे वाटत होते. आज ही मी खूप लवकर उठले, जाग आली अचानकच. उठल्या उठल्या पहिलं त्याला पाहण्यासाठी गेले तर तो मस्त रवंथ करत होता.
    माझे आवरून मी अभ्यासाला बसले खरी पण मन लागत नव्हते. त्यातच चारचाकी गाडी गेल्याचा आवाज आला. ती गाडी पुन्हा माघारी येवू नये असे वाटत होते कारण पुढे काय होणार आहे हे मला माहीत होते.....दरवर्षीप्रमाणेच.
    काही वेळाने गाडी आल्याचा आवाज आला. अवघ्या चौथ्या मिनिटाला त्याची किंकाळी ऐकू आली.... शेवटची. शिर आणि धड अस्ताव्यस्त, रक्ताच्या डोहात पडलेला तो....मी अखेरचा पाहीला. हाडं, मांस, तल्लख बुद्धी असलेल्या माणसांना पुण्य लाभण्यासाठी बळी दिलेला एक "बोकड".
    दहावीत असताना हा प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहिला आणि मटन हा विषयच मी सोडला होता. आत्ता कुठे इतक्या वर्षांनी मी पून्हा मटन खायला लागलीये. नॉन व्हेज शरीरासाठी चांगल असतय. आवड,चेंन्ज म्हणून नक्कीच खावे. पण धर्माच्या नावाखाली, पुण्य कमवायचे म्हणून दहा दिवस प्रेमाने पाळलेल्या "त्याचा" असा एवढ्या मोठ्या प्रमाणावर कत्तल करणे योग्य राहिल का?
   एक बोकड कापले की एका माणसाला पुण्य भेटते आणि एक रेडा कापला की सात माणसांना पुण्य भेटते, हे असे कसे शक्य आहे? तुमच्या पाप-पुण्याची जबाबदारी तुमची स्वत:ची आहे. स्वत:च स्वत:चा दिवा बना, जीवन प्रकाशमय होईल. बिचाऱ्या बळींचा काय दोष?
विचार तर कराल !

                         - समता हेमा अनिल जगताप

Comments

Popular posts from this blog

दशकपूर्ती निमित्ताने.....

बेगम जान

नात्यातील कोडी उलगडताना.....